Thursday, August 24, 2017

कविता :- पुरुष-एक दुर्लक्षित आधारस्तंभ

कविता :- पुरुष-एक दुर्लक्षित आधारस्तंभ

हा माझा, ती माझी
असं फक्त म्हणायचं,
किती दिवस सांगा असं
मन मारून जगायचं

मनी ठेवून मोठी स्वप्न
माणूस करतो लग्न,
आधार होईल जीवनाला
हटतील सारे विघ्न
किती होतात स्वप्न खरे
का मग सांगा बघायचं
किती दिवस सांगा असं
मन मारून जगायचं

वाल्या कोळ्या सारखी इथे
सगळ्यांचीच गत,
मरतो, खपतो, झटतो माणूस
नसताना ऐपत,
इच्छा त्याला सुद्धा आहेत
कधी यांना सुचायचं
किती दिवस सांगा असं
मन मारून जगायचं

जगामध्ये नसते  कुणी
कुणाचे इथे,
जातानाही एकटेच
जायचे तिथे,
सांगून गेले महान लोक
मीच काय सांगायचं,
किती दिवस सांगा असं
मन मारून जगायचं

स्त्रीच्या त्यागाचे या जगी
होणे नाही मोल,
म्हणून का सांगा आम्ही
होतो कवडीमोल?
आम्ही करतो तुमची किंमत,
तुम्ही आम्हा ताडायचं,
किती दिवस सांगा असं
मन मारून जगायचं

स्त्री पुरुष समानतेचा
वाजवू चला ढोल,
कशी येईल समानता
मनात आहे झोल,
समान नागरी कायदा
आला तरी नडायचं,
किती दिवस सांगा असं
मन मारून जगायचं

प्रश्न नव्हे सुटणारा
आहे गुंता मोठा, तरी
मुलं गुणवान
नाही आंनदाला तोटा,
कुढतंच असो
त्यांच्यासाठी जगायचं
किती दिवस सांगा असं
मन मारून जगायचं

©मंगेश पैंजणे
कोल्हापूर

दि. 24 ऑगस्ट 2017
वेळ :- प्रातः 1:58 मि.

No comments:

Post a Comment